あらすじ
निसर्ग-मानव परस्पर संबंधांचा क्रमबध्द व शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करणाऱ्या ‘भूगोलशास्त्र (Geography)’ या विषयाच्या ‘प्राकृतिक भूगोल (Physical Geography)’ व ‘मानवी भूगोल (Human Geography)’ अशा दोन मुख्य शाखा आहेत. ‘प्राकृतिक भूगोल’ निसर्गाचा अभ्यास करणारी तर ‘मानवी भूगोल’ मानवी जीवन वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवी ज्ञानाची क्षितिजे विस्तारल्यामुळे या मुलभूत शाखांमध्ये अनेक उपशाखा व विशेषीकृत विषय उदयास आलेत. ‘वाणिज्यिक भूगोल (Commercial Geography)’ हा ‘मानवी भूगोल’ या मुलभूत शाखेच्या ‘आर्थिक भूगोल (Economic Geography)’ या उपशाखेतून १८ व्या शतकात उदयास आलेला उपयोजित व विशेषीकृत विषय आहे. ‘वाणिज्यिक भूगोल’ या विषयात व्यापार, वाहतूक, दळणवळण, पर्यटन, बँक, साठवणूक इ. वाणिज्यिक क्रियांचा भौगोलिक संदर्भाने आणि मानवी विकासाच्या हेतूने पध्दतशीर अभ्यास केला जातो. प्रस्तुत ‘वाणिज्यिक भूगोल-१’ हे मराठी माध्यमातील पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे यांच्या FYBCom: Semester-I (CBCS Pattern: 2019) भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमास अनुसरून लिहिलेलं आहे. या पुस्तकात बहुतांशी संकल्पना अद्ययावत आकडेवारी, रंगीत चित्र व आकृती स्वरुपात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ‘वाणिज्यिक भूगोल’ हा विषय समजण्यास मदत होईल असे वाटते. प्रस्तुत पुस्तकासाठी जे-जे संदर्भ साहित्य मला उपयुक्त ठरले त्या सर्व ज्ञानसागरांचा मी शतशः ऋणी आहे. आपल्या या भूगोलशास्त्रातील अनमोल कार्यामुळेच भूगोलशास्त्राचे भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद!!!!