あらすじ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यातही त्यांचा दक्षिण दिग्विजय या विषयावरदेखील शेकडो पुस्तके आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लेखन आणि व्याख्यान स्वरूपातही भरपूर काही सांगितले गेले आहे. मग ही पुस्तिका लिहिण्यामध्ये काय हेतू, असा प्रश्न कोणालाही पडेल. याचे उत्तर द्यायचे झाल्यास एक तर श्री. रवींद्र पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत शिवभक्ताने जो शिवचरित्राचा यज्ञ प्रज्वलित केला आहे, महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि पैलू यांवर लिखाण करण्याचे आवाहन केले आहे, त्या यज्ञात आपली ही एक छोटीशी समिधा अर्पण करून महाराजांविषयी आपल्या मनात असणाऱ्या आदर भावना शब्दरूपात व्यक्त कराव्यात, अशा प्रबळ इच्छाशक्तीने हे लेखन केलेले आहे. दुसरे म्हणजे दक्षिण भारतामध्ये महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतरचे अनेक समज-गैरसमज आहेत. उपलब्ध साधनांच्या माध्यमातून ते गैरसमज पुन्हा एकदा दूर करण्याचा हा माझा एक इवलासा प्रयत्न आहे, तो आजच्या तरुण पिढीने जाणून घेणे गरजेचे आहे. हल्लीची पिढी हातातील कागदी पुस्तकांपेक्षा मोबाइल, लॅपटॉप, संगणक आदी माध्यमातून जास्त रमते. केव्हाही कुठेही ते साहित्य वाचू शकतात. त्यामुळे महाराजांचा हा दक्षिण दिग्विजय अधिकाधिक तरुण पिढीपर्यंत पोहोचवून, व्हिएतनामसारखा देश लढवय्या शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शत्रूशी लढा देऊन विजयी होतो, त्या महाराजांचा सुवर्णतेजाने झळाळून उठणारा दक्षिण दिग्विजय तरुण पिढीपर्यंत पोहोचावा, जेणेकरून त्यांच्याही मनात लढवय्या वीराच्या धगधगीत तेजाची सुवर्णज्वाला प्रज्वलित व्हावी आणि त्यांनीही प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे, म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. अत्त दीप भव - डॉ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी