あらすじ
कोकणातल्या एका खेडेगावातून मुंबईत आलेला एक सर्वसामान्य गिरणीकामगार कुटुंबातील युवक. गिरणीच्या प्रसिध्द संपानंतर कुटुंब गावी स्थायिक झालेले. संदिप यांनी मुंबईतील सुरूवातीच्या काळात अत्यंत काबाडकष्ट केले. वेळ पडली तेव्हा हॉटेलात काम केले. बांद्र्याच्या साहित्य सहवासात सुप्रसिध्द साहित्यिकांच्या गाड्याही धुण्याचे काम केले. परळच्या सोशल सर्व्हिस लिगमधे समाजकार्याची तोंडओळख असलेले... २००० साली डिप्लोमा प्रमाणपत्र प्रशिक्षण पूर्ण केले... फुटपाथवरच्या माणसांचे मुंबईच्या थंडी ऊन वाऱ्यातील, तूफानी पाऊस आणि पूरमय परिस्थितीतील निराधार आणि सर्व दृष्टीने वंचिततेचे जीवन पाहून या संवेदनशील माणसाचे मन द्रवले नसते तरच नवल होते. मात्र माणसांसारख्या हाडामासाच्या माणसांचे हालअपेष्टांचे जीवन पाहून संदिप यांचे मन नुसतेच द्रवले असे नाही तर याच रस्त्यावरच्या निराधार वंचितांना माणुसकीचे सन्मानजन्य जीवन मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवन संकल्प केला. त्यांचे जीवनातील दुख, प्रश्न समजून घेवून त्यांचेशी एकात्म होण्यासाठी संदिप अनेकदा फुटपाथवर झोपले. आजही झोपतात. राज्यातील मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यातील आश्रम, शेल्टर होम आणि बालकांसाठीच्या डे केअर सेंटर्सच्या कामासाठी त्यांची अखंड धावपळ आणि पायपीट सुरूच असते... याच जीवन प्रवासात फुटपाथवरचे जीवन जवळून अनुभवताना अंतकरणातून पाझरलेल्या कवितारूपी भावना या कवितासंग्रहातून संकलित करण्यात आल्या आहेत.