あらすじ
इतक्या दिवसात इतके किलोमीटर हा हिशोब “पुणे ते आयोध्या” या सायकल वारीचा कधीच नव्हता ! संतांच्या भूमीतून भक्तीचा आणि शिवरायांच्या स्वराज्यातून पराक्रमाचा वारसा उत्तरेत पेरण्याची सुगी होती ती. प्रभू रामाच्या चौदा वर्षांच्या वनवासाचे प्रतीक म्हणून ही चौदा दिवसांची सायकल तपश्चर्या होती. २६ लाख ७ हजरांपेक्षा जास्त वेळा फिरवलेल्या पेडल चा कठोर रामजप होता तो! एकविशसे किलोमीटर च्या पायघड्यांवर घामाने सजवलेल्या मैफिलीची मनमुराद अनुभूती होती ती. प्रतिकूल परिस्थितीच्या अथांग सागरावर दृढ निश्चयाचा सेतु बांधून स्वतःतील रामत्वाला भेटण्याचा आवेग होता तो. सुरुवातीपासून ते वारी संपेपर्यंत पुढे आलेल्या प्रत्येक हातांमधिल राम होता तो! रोज रात्री थकलेल्या शरीराला पुनः सकाळी नवसंजीवनी देणारा द्रोणगिरी होता तो! आणि एकूणच.... विजगीषु वृत्ती, अढळ धैर्य व प्रगाढ आत्मविश्वासाच्या संगमावर स्वतःतील न्यूनगंड आणि भय क्षाळण्याचा चाकांवरचा महाकुंभ होता तो!