चरित्रकार धनंजय कीर (Charitrakar Dhananjay Keer)
RajendraprasadS.Masurkar
あらすじ
आधुनिक भारतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांची एकाहून एक सरस इंग्रजी व मराठी चरित्रे लिहिणारे प्रसिद्ध चरित्रकार धनंजय कीर यांचे हे चरित्र असून, ते राजेंद्रप्रसाद सखाराम मसुरकर यांनी लिहिले आहे. धनंजय कीर यांचे मूळ नाव अनंत. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांत सारख्याच कौशल्याने लेखन करणारे म्हणून त्यांना समीक्षकांनी ‘सव्यसाची’ या उपाधीने गौरविले. ‘हिंदी राजकारणाची दुसरी बाजू जगाला समजावी’ यासाठी सावरकरांचे चरित्र त्यांनी लिहिले, एकांगी लेखन करणाऱ्या विदेशी पत्रकारांना आणि देशी-विदेशी विद्वानांना या नरवीराची जीवनगाथा माहीत व्हावी, यासाठी त्यांनी इंग्रजी भाषा हे माध्यम निवडले. यानंतर ‘मानवी मूल्यांसाठी मनापासून झटणाऱ्या पुढाऱ्यां’चा शोध घेत घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज इत्यादी महापुरुषांची इंग्रजी चरित्रे लिहिली. त्यामुळे या भारतीय नेत्यांच्या उत्तुंग जीवनकार्याची माहिती जगात सर्वदूर पसरली. फुले-आंबेडकरांचे अनुयायी मराठी भाषिक बहुजन समाजात अधिक, म्हणून त्यांना समजेल अशा मराठी भाषेत कीरांनी त्यांची चरित्रे लिहावीत हे आवाहन महाराष्ट्राचे लाडके नेते यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्याला प्रतिसाद देत बाबासाहेब, फुले, शाहू यांची आणि त्यामागोमाग आणखीही थोर पुरुषांची मराठी चरित्रे त्यांनी लिहिली. अशा या थोर चरित्रकाराचे चरित्र रत्नागिरीतील व्यासंगी पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद सखाराम मसुरकर यांनी लिहिले आहे. मसुरकर यांनी Biographer Dhananjay Keer या नावाने कीर यांचे इंग्रजी चरित्रही लिहिले आहे.














































































































































